महाराष्ट्र

डॉ.सांगळे यांना निरोप देताना सहकारी गहिवरले..

डॉ.सांगळे यांना निरोप देताना सहकारी गहिवरले.

नेवासा फाटा – – नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांना निरोप देताना त्यांच्या जिल्हाभरातील सहकाऱ्यांना भावना अनावर होऊन संपूर्ण वातावरण गहिवरून गेल्याचे अनोखे चित्र पाहावयास मिळाले.

शासकीय आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय क्वचितच पाहायला मिळतो. नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी थोडें न थिडके तब्बल पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ.संदीप सांगळे हे एकमेवच म्हणावे लागतील. आपल्या उपजतच मनमिळावू स्वभावाने त्यांनी जिल्हाभरातील आरोग्य विभागातील सहकार्यांना आपलेसे केले होते. अधिकारीपणाचा रौब न झाडता फिल्ड वर्क पद्धतीने काम करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती.

कोरोना काळात डॉ.सांगळे यांच्यातील नेतृत्व क्षमता खऱ्या अर्थाने सिद्ध झाली. कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडालेला असताना उपलब्ध तुटपुंज्या मनुष्य बळासह संसाधनांच्या प्रचंड टंचाईत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ न देण्याची प्रामुख्याने काळजी घेतली. दुसरीकडे कोरोना रुग्णांना तेव्हढ्याच क्षमतेने सेवा देण्यासाठीही ते सतत तत्पर असल्याचे दिसून आले. शासनाचे सर्व आरोग्य विषयक उपक्रम राबविताना सहकाऱ्यांना विश्वासात घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीने त्यांची जिल्ह्यातील कारकीर्द खऱ्या अर्थाने यशस्वी ठरल्याचे नमूद केले तर ते वावगे ठरणार नाही.

नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरून बदली होऊन डॉ.सांगळे यांनी नुकतीच पुणे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ.सांगळे यांच्या बदलीचे वृत्त समजताच जिल्हाभरातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरला धाव घेतली. डॉ.सांगळे यांना अत्यंत भारावल्या वातावरणात निरोप देताना सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबल्याचे दिसून आले. काहींना तर हुंदका आवरता आला नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतील सौहार्दाचे अनोखे चित्र यानिमित्ताने पहावयास मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!