महाराष्ट्रराजकिय

मुळा’तून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्यास प्राणपणाने विरोध करणार – आमदार गडाख

*मुळा’तून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्यास प्राणपणाने विरोध करणार – आमदार गडाख*

जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात घोडेगावात रास्ता रोको : निळवंडेतून पाणी सोडण्याचा सुचवला पर्याय

घोडेगांव (प्रतिनिधी) – समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी करताना सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा घणाघाती आरोप आमदार शंकरराव गडाख यांनी करुन मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्राणपणाने विरोध करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकार व प्रशासनाला दिला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यांतर्गत मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या सुरु झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अगोदरच इशारा दिल्याप्रमाणे आक्रमक बनलेल्या आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी घोडेगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास त्यांनी जोरदार विरोध केला आहे. हाच कायदा सोलापूर जिल्ह्यालाही लागू होत असताना यंदा तेथील सर्व धरणे कोरडीठाक असताना पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचे प्रयोजन असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याकडे त्यांनी यनिमित्ताने लक्ष वेधले आहे. सोलापूरसाठी पुणे जिल्ह्यातील धरण पाणी साठ्यांना हात लावण्याची हिंमत नसलेले लोक जायकवाडीसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी गळा काढत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. यंदा पाऊसच झालेला नसल्याने नेवासा तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट घोंगावत असून मुळा धरणातून तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यास त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची बाब त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. यंदाची परिस्थिती वेगळी असल्याने मुळा धरण लाभक्षेत्रातील लोकांची गरज लक्षात घेऊन मुळा ऐवजी निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा पर्याय त्यांनी यावेळी सुचविला. निळवंडे धरणात पाणी साठा झालेला असून कालवे नसल्याने हे पाणी लाभक्षेत्रात सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे पाणी निळवंडेत नुसतेच साठवून ठेवायचे का? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी त्याऐवजी हेच पाणी जायकवाडीत सोडल्यास मुळा धरणाखालील लाभक्षेत्रास दिलासा मिळण्याची आशा आमदार गडाख यांनी व्यक्त केली. मुळा धरणातून कितीही पाणी सोडले तरी ते प्रत्यक्षात खाली जायकवाडीत जाते का? हा कळीचा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद करत याबाबत जागृत राहून निर्णायक भुमिका न घेतल्यास तालुक्याचे वाळवंट होण्याचा धोका त्यांनी विषद केला. पदाची पर्वा न करता तालुक्यातील जनतेसोबत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या काळात कमी पाण्यात पाटपाण्याची किमान दोन आवर्तने करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करुन तालुक्यातील शेतकऱ्यांनी फॉर्म भरुन तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख नियोजन करुन सहकार्य करण्याचे आवाहन आमदार गडाख यांनी यावेळी केले.

नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले. अशोक येळवंडे, बाळासाहेब सोनावणे, योगेश होंडे, डॉ.अशोक ढगे, शिवसेना नेते मच्छिंद्र म्हस्के, संजय नागोडे, अशोकराव गायकवाड, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी शेवटी आभार मानले.

*मनाचा मोठेपणा दाखवा -*
वितरण व्यवस्थेअभावी निळवंडे धरणात पाणी साठा तसाच राहणार असल्याने त्यातून जायकवाडीत पाणी सोडण्याची व्यवहारिक मागणी आहे. या मागणीमुळे उत्तरेतील बड्या नेत्यांचा रोष ओढवणार असल्याची जाणीव आहे. परंतु या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नेवासा तालुक्याला दिलासा देण्यासाठी निळवंडेतून पाणी सोडण्यास अडथळे आणू नयेत, अशी अपेक्षा आमदार गडाख यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!