राजकिय

कुटुंबातील दुःखद घटनांचे विरोधकांनी राजकीय भांडवल केले – यशवंतराव गडाख.

 

कुटुंबातील दुःखद घटनांचे विरोधकांनी राजकीय भांडवल केले – यशवंतराव गडाख.

सोनई – महाराष्ट्र 7न्युज वृत्तसेवा

कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविल्याची खंत मुळा उद्योग समुहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली. तालुका दूध संघाच्या कथित वीज चोरी प्रकरणी रुग्णशय्येवरील प्रशांत गडाख यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी अत्यंत भावनाविवश होऊन गडाख बोलत होते.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कनिष्ठ बंधू प्रशांत गडाख संचालक असलेल्या नेवासा तालुका दूध संघाने सुमारे दहा वर्षांपूर्वी वीज चोरी केल्या प्रकरणी महावितरणच्या पालघर येथील पथकाने नुकताच सोनई पोलीसांत गुन्हा दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासह भुमिका मांडण्यासाठी आमदार गडाख यांनी सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलवर कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा रविवारी घेतला. या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांचा हजारोंच्या उपस्थितीत उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

मेळाव्या प्रसंगी उपस्थितांसमोर बोलताना ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले की, संकटं येतात तेंव्हा नेत्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मन मोकळं केलं पाहिजे. प्रशांत गडाख कोमात असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. ते आजारी नसताना असा प्रकार केला असता तर त्यांनी तुमची भिंगरी केली असती, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांकडे सत्ता असतानाच्या काळात विविध संस्था उभारणीच्या माध्यमातून रचनात्मक कामे करायची सोडून हजारो लोकांचे प्रपंच अवलंबून असलेल्या चांगल्या चालू संस्था मोडकळीस आणण्यासाठी त्यांनी त्यांची राजकीय ताकद खर्च केल्याचा आरोप गडाख यांनी हरित लवाद प्रकरणाचा दाखला देऊन यावेळी केला. शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आणला होता, परंतु राज्यातील सत्तांतरानंतर त्याला स्थगिती देण्यात आल्याकडे त्यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले. ही स्थगिती उठविण्यासाठी माजी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पाठपुरावा करण्याची गरज असताना त्यांनी तसे न करता गडाख कुटुंबाच्या द्वेषाचे राजकारण करण्याला प्राधान्य दिल्याचा चिमटा त्यांनी काढला. द्वेषाधारित राजकारणातूनच महाभारत घडल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

वारंवारच्या खोट्या आरोपांसह राजकीय कट कारस्थानांनी उद्विग्नता येणे साहजिकच असल्याचे स्पष्ट करुन परंतु धीर धरुन त्याचा सामना केल्यानेच स्वतःला सिद्ध करता येत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर राजकारण केले, असंख्य चढउतार पाहिले, परंतु एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यातच अनुभवल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. एवढी मोठी संघटना, ताकद मिळण्यास नशिब लागते हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी करुन मोठा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यासाठी निडर होऊन राहण्याबरोबरच संघर्षानेच आपल्याला मोठे केले, याचा विसर पडू न देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

माजी मंत्री आमदार गडाख यावेळी बोलताना म्हणाले की, तालुका दूध संघाच्या वीज मिटरची चावी महावितरण अधिकाऱ्यांच्या
ताब्यात असताना वेळोवेळी झालेल्या तपासणीत त्यांना वीज चोरी कधीही आढळली नाही. मात्र दहा वर्षांपूर्वीच्या कथित वीज चोरीचा दाखला देऊन पालघरच्या अधिकाऱ्यांमार्फत अचानक दंड ठोठावून पोलीसांत गुन्हाही दाखल कसा झाला? याचे कोडे न उलगडण्याइतपत जनता खुळी राहिलेली नाही. तालुका दूध संघाला अडचणीत आणून तो बंद पाडण्यासाठी कारस्थान शिजत असल्याची पूर्वकल्पना मिळाल्याचा गौप्यस्फोट आमदार गडाख यांनी यावेळी बोलताना केला. परंतु पारदर्शक व चोख व्यवहार असल्यामुळे कुठलाच आक्षेप घेण्यास जागाच राहिली नसल्याने राजकीय द्वेषातून विरोधकांनी हे कुभांड रचल्याचा आरोप त्यांनी केला. बाभळेश्वर दूध संघाला दूध पाठविताना तालुक्यातील दूध उत्पादकांना येणाऱ्या प्रचंड अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नेते गडाख यांनी त्यावेळी तालुका दूध संघासाठी प्रचंड प्रयत्न करुन असंख्य मानापमान पचविल्याकडे आमदार गडाख यांनी यावेळी लक्ष वेधले. तालुका दूध संघ उभारणीस त्यावेळी प्रचंड अडचणी येत असल्याने सुरुवातीला खाजगी चिलिंग प्लँट उभारुन त्यामाध्यमातून संघर्ष करत नंतर त्याचे तालुका दूध संघात रुपांतर करण्यात आल्याच्या भूतकाळास त्यांनी यावेळी उजाळा दिला. प्रशांत गडाख यांनी खडतर परिश्रम करुन हा दूध संघ नावारुपास आणल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. आज तालुक्यातील दूध उत्पादकांसाठी मोठा आधार बनलेल्या या दूध संघाचे अस्तित्व पुसून टाकण्यासाठी तालुक्यातील राजकीय विरोधकांनी कंबर कसल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राजसत्तेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेसाठी कल्याणकारी संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात असल्याच्या आरोपाचा आमदार गडाख यांनी पुनरुच्चार करत जिल्ह्याच्या साखर कारखानदारीत मुळा कारखान्याचे सर्वात कमी प्रदुषण असतानाही प्रडुषण नियंत्रण मंडळाकडे त्यांनी खोट्यानाट्या तक्रारी करुन नाहक त्रास देण्याचा प्रताप चालविल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले. यावेळी अॅड. काकासाहेब गायके, सोपान महापूर, बाळासाहेब शिंदे, श्रीरंग हारदे, शरद आरगडे, जानकीराम डौले, बहुजन नेते अशोक गायकवाड, बाळासाहेब काळे ,शरद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विश्वासराव गडाख, सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख,जबाजी फाटके, तुकाराम शेंडे, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, कडुबाळ कर्डीले, भाऊसाहेब मोटे, बापुसाहेब शेटे, सुरेश गडाख, जनार्दन पटारे, अॅड.एम.आय. पठाण, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, अॅड. बन्सी सातपुते, योगेश म्हस्के, अशोक मिसाळ, भैय्यासाहेब देशमुख, नानासाहेब रेपाळे, दिगंबर शिंदे, दिलीप मोटे, नारायण लोखंडे आदींसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

 

…………………………………………………
जनतेचा स्वाभीमान जपला – आमदार गडाख
भावजय गौरी गडाख त्यानंतर प्रतिक काळे आकस्मित मृत्यु प्रकरणाबाबत आमदार गडाख यांनी यावेळी उपस्थितांसमोर भुमिका स्पष्ट करुन त्यांच्या मृत्यूचे भांडवल करुन आपल्या कुटुंबाला कसा मानसिक व कायदेशीर त्रास देण्यात आला, याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी मुळा शिक्षण संस्थेचे सोनईतील शैक्षणिक संकुल पाडण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अपक्ष आमदार असल्याने राजकीय सत्तांतराच्या काळात कुठेही जाऊन मंत्रीपद मिळवू शकत असताना केवळ तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान राखण्यासाठी तसे न केल्याचा खुलासा आमदार गडाख यांनी यावेळी केला.

……………………,……………………………
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र – राजकीय द्वेष भावनेतून गडाख कुटुंबियांना व्यक्तिगत पातळीवर लक्ष्य करण्याच्या विरोधकांच्या राजकीय कट करस्थानाविरोधात यावेळी उत्स्फूर्त गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र बनल्याचे दिसून आले. या राजकीय संघर्षात आगामी काळातही गडाख कुटुंबाची भक्कम साथ करण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!