महाराष्ट्र

*आता महसूल विभागातील दलाल प्रवृत्तीला बसणार आळा राज्यात फिफो प्रणाली लागू*

आता महसूल विभागातील दलाल प्रवृत्तीला बसणार आळा राज्यात फिफो प्रणाली लागू

अहमदनगर-  प्रतिनिधी असिफ सय्यद(महाराष्ट्र 7 न्यूज)

शासनाच्या विविध प्रमाणपत्रासाठी (Government Certificate) दलालांमार्फत शॉर्टकट शोधला जातो. मग ते जात प्रमाणपत्र असो अथवा उत्पन्नाचा दाखला, दलाल प्रवृत्तीमुळे रांगेत असणाऱ्यांची कामे होत नाहीत.
मात्र जे पैसे देऊन दलालामार्फत पोहचतात त्यांची कामे आधी होतात असाच अनुभव आहे. पण या शॉर्टकट साधणाऱ्या दलाल प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ म्हणजेच फिफो प्रणाली वापरण्याचा निर्णय महाआयटीकडून (MAHA-IT) घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे आता प्रमाणपत्र मिळणे सोयीचे होणार आहेच परंतु सामान्य नागरिकांची दलाल प्रवृत्तीमधून सुटका होण्याची अपेक्षा देखील वर्तवण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रथम अर्ज करण्यात आलेल्या व्यक्तीचे काम आधी करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यात देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
आधी अर्ज करणाऱ्यांना पहिले प्राधान्य
आपले सरकार या संकेतस्थळावर अथवा ऑनलाइन सरकारी केंद्रावरून प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जातो. विविध डेस्कच्या माध्यमातून हे अर्ज निकाली काढण्यात येतात. याआधी अर्ज केल्यावर प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत होता. आधी अर्ज केला असताना देखील मधल्याच माणसाला प्राधान्य मिळायचे. दलाल प्रवृत्तीमुळे नंतर केलेला अर्ज देखील निकाली लागत होता. दलाला मार्फतच काम लवकर होते, अशी समज नागरिकांची झाली होती. याला कुठे तरी आळा बसला पाहिजे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे आता ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ या प्रणालीमुळे या प्रकाराला आळा बसणार असल्याचं शासन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
*फिफो प्रणालीने दलाल प्रवृत्तीवर वचक*
फिफो प्रणालीनुसार तारिख आणि वेळेनुसार प्रथम येणारा अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाणार आहे. क्लार्क, अव्वल कारकून अथवा नायब तहसिलदार आणि तहसिलदार अथवा उपजिल्हाधिकारी अशा तीन टप्प्यामधून प्रमाणपत्राचे अर्ज पुढे जात असतात. फिफो प्रणालीमुळे कुणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. आधी आलेल्या अर्जावर आधी विचार आता करण्यात येणार आहे. फिफो प्रणालीमुळे प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे चित्र आहे.
रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, जेष्ठ नागरिक, अल्पभूधारक अशा विविध प्रमाणपत्रासाठी कालावधी ठरवून देण्यात आला आहे. यासाठी आकारण्यात येणारे शुल्क देखील ठरवून देण्यात आले आहे.अहमदनगर सह इतर जिल्ह्यात देखील या फिफो प्रणालीच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे आता सुलभ झाले आहे. आधी अर्ज करणाऱ्यांना आधी प्राधान्य दिले जाणार आहे. aaplesarkar.mahaonline.gov.in यावर ही प्रणाली उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील दलाल प्रवृत्तीला बळी न पडता याचा लाभ घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!